Saturday, September 17, 2011

आपण ह्यांना पाहिलत का?

रविवार सकाळी अप्रतिम आळसावून स्वत:ला पांघरुणात गुडूप करून लोळण्यासारखं दुसरं सुख या जगात नाही. गेल्या रविवारी या स्वर्गीय सुखाचा उपभोग घेताना मी तल्लीन झालो असताना अचानक आमच्या मातोश्रीं प्रकटल्या आणि त्यांनी त्यांच्या आदेशाचं ब्रह्मास्त्र माझ्यावर सोडलं की ‘ आज खोली आवरून झाली नाही तर जेवायला मिळणार नाही’. गेले कित्येक रविवार मी ‘पुढच्या रविवारी खोली एकदम चकाचक करीन.. तू बघच’ असा आशीर्वाद देत आलो असल्याने यावेळी मला कोणतीच सवलत मिळायची काहीच शक्यता नव्हती.

‘नको देऊ जेवायला... मी बाहेरच जेवीन’ असा attitude दाखवला असता तर कानाखाली आवाज निघाला असता (मुलं मोठी झाल्यावर त्यांना घरातले बडवत नाहीत अशी जर कोणाची ‘गैर’समजूत असेल तर त्याला माझ्या घरी आग्रहाचे निमंत्रण आहे. इथे आपले सगळे गैरसमज दूर होतील. आजही माझे आईवडील स्वत:च्या आणि वेळ आल्यास दुसऱ्याच्या मुलांना बडवायचे calibre राखून आहेत... तेव्हा नक्की या)

थोडक्यात मी पुढच्या १५-२० मिनिटात खोली आवरण्यासाठी सज्ज झालो. तरी नेमकी सुरुवात कुठून करायची? आणि खोली आवरली आहे असा आईला किमान ‘फील’ येईल यासाठी नेमकं काय करायचं हे ठरवताना माझा काही वेळ गेला. त्यातल्या त्यात बरेचसे उगाचच गोळा केलेले कागद, ब्रोशर्स, पुस्तकं अशी रद्दी गोळा करून ती हातावेगळी केली की खोलीत बरीच जागा रिकामी होते, या आजपर्यंतच्या अनुभवला स्मरून मी रद्दीसाठी eligible गोष्टी शोधायला लागलो आणि शोधता शोधता काही कल्पना नसताना मला एकदम ‘खजिना’च मिळाला. प्री-प्रायमरी पासून ते कॉलेज संपेपर्यंतच्या वर्गाचे/ग्रुपचे फोटो असणारी फाईल मला अगदी अचानक सापडली.

आजपर्येन्तचे सर्व मित्र-मैत्रिणीं एकदम भेटावेत असं काहीतरी मला वाटलं. सोशल नेटवर्किंग साईटवर त्यातले काही लोक अधून मधून भेटायचे(?). पण त्यांचे वेगवेगळ्या वयातले फोटो मला का कोणास ठाऊक पण खूप जास्त जवळचे वाटले... ‘खरे वाटले’. सगळीच कोणत्या ना कोणत्या क्षेत्रातली गुणी माणसं. एकापेक्षा एक सरस... अव्वल... स्वत:च्या गुणांवर स्वत:ला हवं तसं जगता येण्याची क्षमता असलेली.

कोणाकडे चित्रकलेचा हात होता... कोणाचा गळा मैफल रंगवण्यासाठीच घडत होता... कोणाची माणसे जोडून ग्रुप लीड करण्याची हातोटी बेमिसाल होती... कोणाची बुद्धिबळातील आकलनशक्ती चकित करणारी होती. कोणाची खगोलशास्त्रातल्या कुतुहलापोटी न झेपणारी इंग्रजी पुस्तके वाचण्याची धडपड सुरु असायची... कोणी परत पायात धरून नृत्य करत समारंभ गाजवून जायचं... तर कोणाचं वक्तृत्व हमखास टाळ्या मिळवायचं. कोणाचं प्रगती पुस्तक complex देऊन जायचं तर काही जणींचं खेळाच्या मैदानावरील aggression धडकी भरवणायचं.

अशा असंख्य गुणवंत नक्षत्रांनी सजलेलं ते चित्ररुपी तारांगण पाहताना मनात पहिला प्रश्न आला की आज ही सगळी ‘भारी’ मंडळी आता कुठे आहेत?... माझ्या सोशल नेटवर्किंग साईटवरच्या प्रोफाइलमध्ये ही फक्त ‘नावापुरती’ आहेत. पण मी ज्यांच्याशी मैत्री केली होती.. ज्यामुळे करावीशी वाटली होती, तो मित्र, ती मैत्रीण कुठेतरी गायब झालीय.. त्यांची ती धमक झाकोळली गेलीय आणि म्हणूनच ते online भेटले तरी त्यांच्याशी connect होता येत नाहीये... आमच्यात संवादच होत नाहीये.

कारण मला संवाद त्या चित्रकाराशी त्याच्या नवीन चित्राशी करायचाय, गायिकेने शिकलेला नवीन राग- नवीन जागा ऐकून मंत्रमुग्ध व्हायचयं, एखाद्या जाडजूड खगोलशास्त्राच्या पुस्तकातली काही प्रकाशवर्षे दूर असणारी आकाशगंगा त्या हुशार मित्राकडून समजून घेऊन मला अवाक् व्हायचंय, badminton च्या कोर्टवर पुन्हा एकदा फाजील आत्मविश्वासाने मित्राला आव्हान देऊन मला हरायचय, बुद्धिबळाच्या डावात कात्रीत सापडल्यावर माझ्या मित्राला मला हसताना पहायचय.. १०० मी. पळताना माझ्या मैत्रिणीला माझ्यापेक्षा वेगात पळताना पाहून कावरंबावरं व्हायचय आणि चिडवून त्रास देणाऱ्यांना मला ‘बदकावून’ही काढायचंय.

पण ह्यातलं काही होत नाहीये कारण ही गुणी माणसं कुठेतरी हरवलीयत. जगाच्या रहाटगाडग्यात... करिअरच्या न संपणाऱ्या शर्यतीत... किंवा प्रोफेशनल लाईफ(?) मधल्या फसव्या ‘एटिकेट्स’मध्ये. म्हणून मला आज हे जुने फोटो माझ्या सर्व मित्र-मैत्रिणींना दाखवत ओरडून विचारायचय की ‘आपण ह्यांना पाहिलंयत का?’

माझी मैत्री या फोटोतल्या उत्साही, हरहुन्नरी आणि कशानी तरी ‘passionate’ असलेल्यांशी आहे. डीग्र्यांच्या कागदात स्वत:ला गुंडाळून एक तारखेला मिळणाऱ्या ‘पे चेक’कडे पाहत आपण खूप बुद्धिमान झालो आहोत असा टेंभा मिरवणाऱ्या कोणालाही मी ओळखत नाही आणि ओळखायची गरजही मला वाटत नाही.

मला ही सगळी हरवलेली मंडळी पुन्हा गोळा करायचीत.. म्हणूनच माझ्या शाळेतल्या फोटोकडे पाहत ‘आपण ह्यांना पाहिलंयत का?’ म्हणत मी आज माझ्यापासून सुरुवात केलीय. स्वत:ला शोधता शोधता मी बाकीच्यांना शोधायचा माझ्यापरीने निश्चित प्रयत्न करीन.. मग पुन्हा एकदा आम्हा ‘अवली’ मुलांचा वर्ग भरेल... धांगडधिंगा होईल... वातावरण दणाणून जाईल. तेव्हा कदाचित कोणीतरी मोठं(???) येऊन आमच्यावर वसावसा ओरडेल आणि त्यावेळी सगळ्यांच्या वतीने मी मोठ्या आनंदाने वर्गाबाहेर अंगठे धरून शांतपणे उभा राहीन...!!

7 comments:

  1. Ekdum school days made gelyasarkhe Watatey! Ani Rancho's scool cha watawaran eagle shewti ekdum. Mastach watle !

    ReplyDelete
  2. awesome.... ur style of writing reminds me of PL's style :))

    ReplyDelete
  3. mast lihile aahes re. Chan vatale vachun.felt nostalgic abt school days.

    ReplyDelete
  4. faar bhari lihile aahes.....vachata kshani school days chi aathvan yete. :)

    ReplyDelete
  5. You can again live these days with ur kids :)

    ReplyDelete
  6. छान !!!
    पुन्ह्या ते 'सोनेरी दिवस' आठवण करून दिलेस..

    ReplyDelete