‘बाराखडी’ हा आपल्या शैक्षणिक आयुष्याचा श्रीगणेशा करणारा घटक. शाळा कोणतीही
असो.. शिक्षक कोणताही असो... शिक्षणाचे माध्यम कोणतेही असो... प्रत्येक माध्यमाची
बाराखडीही असतेच. त्याच्याशिवाय शिक्षणाची सुरुवात होऊ शकत नाही.. शिक्षणाचा
संस्कार पूर्णत्वाने अंगी बाणवला जाऊ शकत नाही. आयुष्य जगण्यासाठी, अनुभवण्यासाठी
नितांत गरजेचे असलेले मुलभूत शिक्षण जसे की चालणे, बोलणे, स्वच्छ राहणे, स्वावलंबी
होणे आपल्याला आपल्या आईकडून मिळते. अगदी तसेच - ज्ञानाच्या महासागरात निर्धास्त
मनाने झेप घेण्याचे कसब आपल्याला या ‘बाराखडी’मुळे मिळते. जसे बोलण्या-चालण्याचे
नेमके तंत्र नसेल तर दैनंदिन आयुष्य अवघड होते. तसेच बाराखडीवर प्रभुत्व नसेल तर
शैक्षणिक आयुष्याचा बोजवारा उडतो. त्यामुळे सर्वसामान्य विद्यार्थी असो वा प्रौढ
साक्षरता वर्गातील एखादा वृद्ध.. दोघांसाठीही हे अत्यावश्यक बाळकडू आहे.
‘बाराखडी’ म्हणजे केवळ अक्षरओळख नाही, एका श्वासात अ..आ..इ..ई..उ..ऊ अशा
अक्षरांची विविध स्वर – व्यंजने मांडण्याची इच्छा निर्माण करणारी अगम्य गिचमीड नाही
की रुपया – सव्वा रुपयात मिळणारी आणि एक दिवस ‘ही का विकत घेतली?’ असा विचार करून
रद्दीच्या गठ्ठ्यात भिरकावून देण्याची छाडमाड पुस्तिका तर नाहीच नाही. ‘बाराखडी’चे
मोल अनन्यसाधारण आहे... ‘अतिपरिचयात अवज्ञा’ असल्याने ते कालांतराने जाणवत नाही
इतकेच. पण ज्ञानार्जनाच्या प्रत्येक क्षणाची नाळ या बाराखडीशी जोडलेली असते. (आपण
ज्या माध्यमातून शिक्षण घेतो.. त्या माध्यमाच्या बाराखडीशी)
थिअरी म्हणून विचार केला असता... वर लिहिलेले सर्वकाही मला पटते. पण आजूबाजूला
नजर फिरवल्यावर, आज शाळेत जाणाऱ्या लहान मुलांचा दिनक्रम पाहिल्यावर, एक दिवस
त्यांच्यातला बनून त्यांचा आख्खा दिवस अनुभवल्यावर प्रश्नांची वावटळ उभी राहते. त्यातले
काही पुढीलप्रमाणे -
माध्यमाची बाराखडी एकाच असली तरी
शिक्षक – विध्यार्थी ह्यांच्यात सुसंवाद का नाही? शिक्षकांची शिकवण्याची आणि
विद्यार्थ्यांची समजून घेण्याची भाषा वेगळी का आहे?
विद्यार्थ्यासाठी शिक्षक म्हणजे
फक्त हजेरी घेणारी आणि वर्गात कमी शिकवून, फक्त प्रायव्हेट क्लासमधे ‘पोर्शन’
पूर्ण करणारी असामी आहे का? आणि शिक्षकासाठी वर्गात विद्यार्थी साठातला किंवा
सत्तरांच्या भाऊगर्दीतला एक आणि प्रायव्हेट क्लाससाठी बेअरर चेक आहे का?
आज दरवर्षी शेकडो विद्यार्थी
आत्महत्या करतात आणि तरीही शिक्षणव्यवस्था झोपा का काढते? पालक अजूनही आपल्या
मुलांची खरी कुवत ओळखण्यात टाळाटाळ का करतात?
आत्महत्या टाळण्यासाठी म्हणे - आता ‘आठवी’ पर्येंत परीक्षा नाहीत.. विद्यार्थ्याच्या
विकासाचा विचार केला असता हा उपाय म्हणजे ‘रोगापेक्षा इलाज भयंकर’ म्हणायचा नाही
का?
द्वितीय आणि तृतीय श्रेणीच्या
शहरात दर्जेदार शिक्षण देण्यासाठी काही ठोस उपाययोजना केली जाणार आहेत का?
शिक्षणसंस्थांचे, उत्तम प्राथमिक शाळांचे ‘decentralization’ कधी होणार आहे?
या सर्व प्रकारात मराठी शाळांना
काही भविष्य असणार आहे का?
अगदी प्राथमिक शिक्षणापासून
दर्जेदार शिक्षण मिळवण्यासाठी मोजावे लागणारे पैसे पाहता – शिक्षण ही फक्त एक गुंतवणूक
योजना बनून राहिली आहे का?
दिवसेदिवस भारताच्या ‘सर्विस
प्रोव्हायडर’ या भूमिकेमुळे Medical, Engineering, IT अशा ठराविक शिक्षण घेतले तरच विद्यार्थ्यांचे
आयुष्यात काही होऊ शकेल का?
कला, खेळ, शाररिक शिक्षण या
गोष्टी पूर्णपणे ‘बाद’ श्रेणीत गेल्या आहेत का?
शिक्षकाच्या शिकवण्याच्या आणि विद्यार्थांच्या आकलनाच्या भाषेत समन्वय असणे
आवश्यक असते. पण सध्या हे दोन्ही उद्देश फसताना दिसत आहेत. विद्यार्थ्यांची समजून
घेण्याची ‘भाषा’ बदलते आहे आणि त्यांना समजावण्यासाठी शिक्षकांचे बी.एड./डी.एड.
च्या डेग्रीने सर्वमान्य केलेले शिक्षणकौशल्य(?) दिवसेंदिवस बोथट होत आहे.
आज वेगवान आयुष्यामुळे नवनवीन प्रश्न निर्माण होत आहेत. घरातला संवाद तुटत
आहे.. नात्यांच्या व्याख्या बदलत आहेत. सामाजिक जाणीव दिवसेंदिवस कमी होत आहेत..
जगण्याची लढाई दिवसेंदिवस बिकट होत आहे... आणि नेमके जगावे कसे ह्याबद्दल संभ्रम
वाढत आहे. प्रत्येकजण ‘मी..माझे’ या कोषांत अधिकाधिक गुरफटतो आहे.
त्यामुळेच आपल्याला आपल्या आवडत्या क्षेत्रात करिअर करता येईल असा विश्वास
वाटत नाही.. चाकोरीबाहेरची वाट निवडण्याचे धैर्य दाखवता येत नाही... रट्टा मारून परीक्षा
पास झालो तरी शाळेबाहेर आल्यावर नापास होण्याचे असंख्य अनुभव येतात.. त्यामुळेच आपल्यासारखे
शालेय जीवनात अग्रेसर असणारे कित्येक शाळामित्र आयुष्यात घायकुतीला आलेले दिसतात.
कोणत्याही घरात डोकावले किंवा नववी – दहावीच्या विद्यार्थ्याच्या विचारांचा,
त्यांच्यात आपापसात होणाऱ्या चर्चांचा बारकाईने अभ्यास केला की ह्या गोष्टी
जाणवतात. नकळत्या वयात असंख्य प्रश्नाच्या slow poisioning मुळे विचारांना येणारी संभ्रमावस्था जाणवते... यातल्या कोणत्याही प्रश्नांना न
भिडणारी, प्रश्नांची उत्तरे देऊ ना शकणारी शिक्षणपद्धती कुचकामी वाटते... आणि ‘शिक्षण
हे फक्त नोकरी मिळवण्याचे माध्यम आहे’ अशा सर्वसंमत दृष्टीकोनाची कीव करावीशी
वाटते.
भारताची आज होणारी प्रगती आणि २०२० मध्ये प्रत्येक भारतीय (ज्याचे बरे चालले
आहे फक्त तोच) पहात असले ‘सुपरपॉवर’ चे स्वप्न ह्यांचा विचार करता माझे हे विधान
मूर्खपणाचे वाटेल. पण मत प्रदर्शित करण्यापूर्वी एकदा प्रत्येकाने आपल्याजवळची information आणि knowledge ह्यांची तुलना करावी.
या शिक्षणव्यवस्थेचा अनेक वर्ष विध्यार्थी(?) असल्याने मी ठामपणे म्हणू शकतो
की –
We are not getting
education... we are just getting information!.
फार इमोशनल न होता, खूप नेगेटीव न होता.. साधा सोपा विचार केला असता – माझे मत
असे आहे की आज मुलांची गोष्टी समजून घेण्याची, समजून सांगण्याची भाषा बदलते आहे. पर्यायाने
शिक्षणाची भाषा बदलते आहे.. व्यापकता वाढत आहे आणि त्यामुळे शिक्षणव्यवस्थेत
असणाऱ्यांच्या जबाबदाऱ्या वाढत आहेत.
या सर्वांचे भान जपणारी अशी ‘शिक्षण व्यवस्थेची’ बाराखडी असावी.
यापुढचा स्वाभाविक प्रश्न हाच असणार की ‘शिक्षणाची बाराखडी कशी असावी?’ शिक्षणाच्या
माध्यमाची तोंडओळख, अक्षरओळख ह्यांच्यापुढे जाउन - काळानुसार शिक्षणाची बदलणारी व्याख्या,
गरज आणि विद्यार्थी – शिक्षक – पालक – सरकार अशा सर्वाच्या कर्तव्य व
जबाबदाऱ्यांची पूर्ण माहिती देणारी या ‘बाराखडीत’ असावी. अक्षरांच्या विविध
प्रकाराप्रमाणे – विद्यार्थ्यांच्या बुद्धीमत्तेच्या विविध पातळया कशाप्रमाणे
हाताला जाव्यात ह्या बद्दलही ठोस उपाययोजना असावी.. जातीनुसार कोटे ठरवण्यापेक्षा
ते बुद्धीमत्तेच्यानुसार ठरवले जावेत (ते देखील आवश्यक वाटल्यास).. आणि मुख्य
म्हणजे ही ‘बाराखडी’ सातत्याने ‘अपडेट’ करत राहावी.
१९७० सालच्या आसपास सरकारने नियुक्त केलेल्या ‘कोठरी कमिशन’ च्या अहवालातही
तशा प्रकारच्या शिफारसी केल्या असतील, त्याही एकदा समजून घ्यायला हव्यात. अर्थात
त्यानंतर ४० वर्ष लोटली असल्याने नव्याने सुरुवात करावीच लागणार आहे. तरच कुठेतरी
विद्यार्थ्यांच्या आत्महत्या थांबतील, योग्य वयात विद्यार्थ्यांना स्वसामार्थ्याची
– आपल्या अंगभूत गुणांची माहिती होईल आणि प्रपंचाची सोय या व्याख्याच्या पुढे
जावून शिक्षणाकडे पाहण्याची नवा दृष्टीकोन विकसित होईल. पालक, शिक्षण ह्यांना
स्वत:ची भूमिका पडताळून पाहता येईल आणि खऱ्या अर्थाने सकस शिक्षण व्यवस्था आकार घेईल.