अव्यक्त...
Thursday, March 28, 2013
बाराखडी
Wednesday, February 15, 2012
Sunday, October 16, 2011
देसी ‘स्टीव्ह’ची गोष्ट
कणखर देशा... दगडांच्या देशा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राज्यातल्या माणसांची हृदयेही पाषाणाची असावीत अशी शंका येणारी घटना त्या काळोख्या रात्री घडली. एका कॉलेजकुमारीने नको त्या उद्योगातून जन्माला आलेल्या अवघ्या तीन दिवसांच्या ‘स्टीव्ह’ला कचराकुंडीत फेकून दिलं... आणि ही माता गडद अंधारात कायमची दिसेनाशी झाली.
दुसऱ्या दिवशी सकाळी नेमाने फेरफटका मारायला निघालेल्या एका आजीआजोबांना ‘स्टीव्ह’च्या रडण्याचा आवाज ऐकू गेला आणि मग पोलिसांच्या उर्मट प्रश्नांना उत्तरे द्यायची मानसिक तयारी करून त्यांनी चौकीत फोन लावला. मग पोलीस आले.. कचऱ्याच्या ढिगातून ‘स्टीव्ह’ला बाहेर काढलं... पंचनामा झाला आणि मग ‘स्टीव्ह’ची वैद्यकीय तपासणी करून त्याला एका सरकारी इस्पितळात ठेवण्यात आलं.
इतके ऊन-पावसाळे पाहूनही अशा पद्धतीने लहान मूल सापडल्याचा अनुभव त्या आजी-आजोबांसाठी नवीन होता.. हेलावून टाकणारा होता. त्यामुळे त्या दोघांनी शक्य होईल तेवढं ‘स्टीव्ह’साठी करायचं ठरवलं (अर्थात आपल्या अमेरिकेत स्थायिक झालेल्या मुलांना काहीही न सांगता). स्टीव्हला ज्या अनाथाश्रमात ठेवलं होतं तिकडे ते दोघे गेले. नुकताच त्यांच्या लग्नाचा पन्नासावा वाढदिवस झाला होता त्यामुळे त्यांना तसंही काहीतरी ‘सोशल कॉज’साठी करायचं होतचं त्यामुळे त्यांनी त्या अनाथाश्रमाला भरपूर देणगी दिली. ती देताना स्टीव्हला चांगल्या घरात दत्तक देण्याची अट घातली आणि ती पूर्ण होईपर्येत देणगीतली काही रक्कम स्वत;जवळ राखून ठेवली. (बहुतेक त्यामुळेच) खूप वर्ष मूल होत नसलेल्या सुसंस्कृत कुटुंबात स्टीव्हला दत्तक देण्यात आलं. त्या आजी-आजोबांचे कष्ट सार्थकी लागले... त्या नव्या घरात आनंदाला उधाण आलं... स्टीव्हचं कोडकौतुक सुरु झालं. अक्षरशः दृष्ट लागावी अशी कलाटणी स्टीव्हच्या आयुष्याला मिळाली.
मग काय? एक दिवस दृष्ट लागलीच. दत्तकविधीनंतर अवघ्या दोन वर्षातच स्टीव्हच्या या नव्या मातेला दिवस राहिले आणि मग (सर्व नातेवाईक, मित्रमंडळींच्या मते) त्या घराला ‘AUTHORISED’ वारस मिळाला आणि स्टीव्ह ‘पायरेटेड मुलगा’ कम ‘घरगडी’ झाला.
तरीही लोकलज्जेखातर स्टीव्हला शाळेत घालणे भाग होते म्हणून मग स्टीव्हची बोळवण एका साध्या शाळेत करण्यात आली. अर्थात त्यानी स्टीव्हची बुद्धीमत्ता लपून राहणार नव्हती. आपल्या तल्लख बुद्धीच्या तडाख्याने स्टीव्हने (नोकरी मिळत नाही म्हणून बी.एड. केलेल्या) शिक्षकांना लोळवायला सुरुवात केली आणि त्यांचा राग ओढवून घेतला. मग त्याच्या कुतूहलपूर्ण प्रश्नांना निरर्थक ठरवून त्याला वाह्यात ठरवण्याचा चंग त्याच्या शिक्षकांनी बांधला... कायम त्याला वर्गाबाहेर उभं केलं जाऊ लागलं... स्टीव्ह चौथीत असताना त्यांनी सातवी, आठवीच्या पुस्तकातील प्रमेय वापरून गणिते सोडवली म्हणून त्याचा पेपर भर वर्गात फाडून टाकण्यात आला आणि पालकसभेतून स्टीव्हला मुलांना बिघडवण्यासाठी कारणीभूत ठरवण्यात आलं.
या प्रगती(??)मुळे स्टीव्ह घरात आणखीनच नावडता बनला, सणसमारंभ, घरगुती कार्यक्रम, गेट-टुगेदर अशा कार्येक्र्मातून त्याला ‘बॅन’ करण्यात आलं. त्यामुळे मग सगळं कुटुंब एखाद्या कार्यक्रमाला गेल्यावर जेवण मिळवण्यासाठी स्टीव्हला पाच-सहा कि.मी. पायपीट करून एखाद्या देवी-देवतांच्या संस्थानाच्या/प्रतिष्ठाण (??) च्या महाप्रसादावर भागवावं लागायचं.
तरीही स्टीव्ह लढत राहिला.. स्वत:च्या आकलनानुसार, उपलब्ध स्त्रोतातून प्रयत्न करत राहिला... ज्ञान मिळवीत राहिला. बारावीनंतर इंजिनिअरिंगला जावे अशी त्याची फार इच्छा होती पण त्याच्या माता-पित्यानी त्याच्या हातावर कॉमर्स कॉलेजची अॅडमिशन टेकवली. स्टीव्ह वैतागला.. कॉलेजला जाईनासा झाला... नाक्यावरच्या कट्ट्यावर बसून कटिंग चहा आणि क्रीमरोल खात तो आपली चित्रविचित्र गॅजेटस् बनवू लागला. एक दिवस त्याने स्वतःची कंपनी उघडण्याचा निर्णय घेतला. भांडवल मिळवण्यासाठी अनेक बँकांचे त्याने खेटे घातले पण प्रत्येक ठिकाणाहून त्याला धक्के मारून बाहेर घालण्यात आले.
स्टीव्ह रडकुंडीला आला. आत्महत्या करावी या विचाराने एका तळ्यापाशी गेला. तळ्यातल्या गणपतीला वंदन करावे आणि आयुष्य संपवावे हा त्याचा निर्णय पक्का झाला आणि त्यानी मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केला. तिथल्या प्रसन्न वातावरणामुळे स्टीव्हच्या मनाला जरा शांतता लाभली आणि अचानक (बहुतेक गणरायाच्या कृपेने) त्याला एक अद्वितीय कल्पना सुचली. आत्महत्येचा बेत रद्द करून स्टीव्ह झपाटून कामाला लागला आणि त्यानंतरच्या गणेशोत्सवात स्टीव्हने एका मंडळाच्या वतीने ‘टच आशीर्वाद’ गणपती लॉन्च केला. गणरायाच्या चरणांना भक्तीभावाने ‘टच’ केल्यावर ‘तथास्तु’ असं आशीर्वाद मांडवभर घुमायचा आणि चरणस्पर्श करणारा भक्त आणि त्याला आशीर्वाद देणारा बाप्पा अशी ‘इमेज’ तिथल्या स्क्रीनवर दिसायची (जास्तीचे पैसे देउन त्या दृश्याची प्रिंटपण भक्ताला मिळायची). ‘टच आशीर्वाद’ मूर्तीनी धमाल उडवून दिली... मंडळानी तुफान पैसा कमावला आणि मंडळाचा ‘भाई’ स्टीव्हच्या धंद्याचा फायनान्सर कम पार्टनर झाला.
‘भाई’ला त्याच्या गावातून निवडणूक जिंकायची होती त्यामुळे सर्वप्रथम ‘स्टीव्ह’ने आपले लक्ष ग्रामीण भागावर केंद्रित केले आणि निरक्षर शेतकऱ्यांसाठी आणि साखरसम्राटांसाठी अफलातून गॅजेटस् बनवली. आता शेतकरी झाडाच्या सावलीत बसून टच पॅडवर नुसता ‘टच’ करून खुरपणी, नांगरणी, फवारणी करू लागला. एका ‘टच’नी आपला माल कारखान्याच्या गोडाऊनपर्यंत पोचवू लागला. साखरसम्राटांना एक ‘टच’ करून आपला काळा पैसा एका खोट्या अकाउंटमधून दुसऱ्या खोट्या अकाउंटमध्ये दडवता येऊ लागला. सगळं मस्त सेट झालं... धंदा वाढला... ‘भाई’ दणक्यात निवडणूक जिंकला.
पण आता त्याला स्टीव्हला नफ्यात हिस्सा देणं जीवावर आलं त्यामुळे एक दिवस त्याने स्टीव्हसमोर घोडा ठेवला. कंपनीतून आत्ताच्या आता कल्टी मारली तर जीव न घेण्याची हमी त्याने स्टीव्हला दिली. बिचाऱ्या स्टीव्हला स्वत:च सुरु केलेल्या कंपनीतून बाहेर पडावं लागलं. तो अक्षरशः रस्त्यावर आला. त्यात त्याचं लग्नाचं वयही उलटून चालले होते. आता मंत्री झालेल्या ‘भाई’च्या धाकाने स्टीव्हला कोणी भांडवल देईना आणि पक्की नोकरी व धंदा नसल्याने त्याला पोरगीही मिळेना. शेवटी त्याच्या आईवडिलांनी त्याचा बँक बॅलन्स हातात घेतला आणि उलटा मुलीला हुंडा देऊन शेजारच्या राज्यातली एक घोडनवरी स्टीव्हच्या गळ्यात मारली (आणि मधल्यामध्ये आजवर स्टीव्हच्या पालनपोषणासाठी(???) केलेले पैसेही वळते केले).
लग्नाच्या निमित्ताने शेजारच्या राज्यात गेलेल्या स्टीव्हला ते ‘झिरो लोडशेडिंग’ असणारे राज्य फार आवडले. तसेही ‘दगडांच्या देशात’ भाऊबंदकीची भांडणे सोडून बाकी काही होत नव्हतेच आणि ‘भाईंच्या’ दबावामुळे काहीही करताही येणार नव्हते. त्यामुळे काही वर्ष तरी त्या राज्यात स्थायिक होण्याचा निर्णय त्याने घेतला. मग एकदिवस नव्या कंपनीच्या पायाभरणीसाठी तिथल्या जनता दरबारात त्याने राज्याच्या दाढीवाल्या मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी अगोदरच स्टीव्हबद्दलची सर्व माहिती मिळवली होती. त्यामुळे त्याला पाहताच मुख्यमंत्र्यांनी ‘केम छो स्टीव्हभाई?’ असे म्हणत त्याला मिठीच मारली. आयुष्यात स्टीव्हचा इतका मोठा बहुमान पहिल्यांदाच झाला आणि ‘पिकतं तिथे विकत नाही’ ह्याची त्याला प्रचीतीही आली’... आपली कोणालातरी किंमत आहे ह्या भावनेने स्टीव्ह गहिवरला.
दाढीवाल्या मुख्यमंत्र्यांनी स्टीव्हला पूर्ण सपोर्ट दिला आणि पुढच्या पाच वर्षात स्टीव्हची कंपनी नावारुपास आली आणि असंख्य लोकांना रोजगार मिळाला. अनेक उत्तमोत्तम प्रकल्पांमुळे त्या राज्याचे नाव जगाच्या नकाशावर आले.. मुख्यमंत्र्यांनी आपली खुर्ची बळकट केली आणि स्टीव्ह विकासाचे ‘रोल मॉडेल’ झाला.
त्याचे कर्तृत्व पाहून अलीकडच्या राज्यातील साहित्य संमेलनात ‘लाथ मारीन तिथे पाणी काढीन’ ही म्हण बदलून ‘टच करीन तिथे पाणी काढीन’ अशी करण्याचा प्रस्ताव युवा साहित्यीकांतर्फे सादर करण्यात आला (त्यामुळे तो ताबडतोब फेटाळलाही गेला). मग एक दिवस स्टीव्हने दाढीवाल्या मुख्यमंत्र्यांचा सपोर्ट घेऊन ‘भाई’ला एन्काउंटरची धमकी दिली आणि आपली आधीची कंपनी परत मिळवली. (दाढीवाल्या मुख्यमंत्र्यांची ‘एकूण क्षमता’ पाहता ‘भाईने’ गपचूप कंपनी परत दिली) स्टीव्ह सर्वार्थाने जिंकला.
पण परत एकदा नशिबाने घात केला... स्टीव्हला कॅन्सर डिटेक्ट झाला. उपचाराकरिता देशादेशांच्या वाऱ्या सुरु झाल्या. पण यश येईना... स्टीव्हला हातात असलेल्या अपुऱ्या वेळेची कल्पना आली आणि त्याने आपला पुरता जोर लावला. मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या तिजोरीच्या चाव्या त्याच्या हातात दिल्या आणि तो म्हणेल त्या प्रकल्पांना ‘तात्काळ’ मंजुरी दिली. खऱ्या मातृप्रेमाला कायमच्या पारख्या झालेल्या स्टीव्हने आपल्या कल्पनेतील आईच्या स्मरणार्थ ‘आई-फोन’, ‘आई-पॅड’,’आई-मॅक’ अशी सरस उत्पादने बनवली आणि त्या राज्याला देशातील सर्वोत्तम राज्य बनवून एक दिवस शेवटचा श्वास घेतला.
मात्र त्याची गोष्ट इथेच संपली नाही. स्टीव्हवर अंत्यसंस्कार कोठे करायचे यावरून दोन्ही राज्यात संघर्ष सुरु झाला... आंदोलने झाली... २०-२५ लोकांचे मुडदे पडून त्यांचेही अंत्यसंस्कार झाले पण स्टीव्हला मात्र मुक्ती मिळेना. शेवटी हा वाद सर्वोच्च न्यायालयात गेला. न्यायालयाने दोन्ही राज्यांच्या सीमेवर स्टीव्हचे अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय दिला. अंत्यसंस्कारानंतरच्या शोकसभेला त्याच्या दत्तक कुटुंबानी, ‘भाई’नी, राज्यकर्त्यांनी झाडून हजेरी लावली आणि स्टीव्हबद्दल बोलण्याऐवजी ‘स्टीवला घडवण्यात आपले कसे मोलाचे योगदान होते’ हे सांगून स्वत;ची पाठ थोपटून घेतली.
सरतेशेवटी दाढीवाले मुख्यमंत्री भरलेल्या कंठाने बोलायला उठले. काहीक्षण स्टीव्ह्च्या फोटोकडे पाहत ते म्हणले “स्टीव्ह हा नाविन्याच्या ध्यासाने कायम भुकेला राहिलेला एक ‘हेल्दी’ मनुष्य होता. आयुष्यातल्या प्रत्येक अडचणीकडे त्यानी ‘हेल्दी स्पर्धेच्या’ दृढीने पहिले आणि नशिबावर कोणतेही खापर न फोडता त्यानी आयुष्यभर ‘हेल्दी अॅटीट्यूड’ने काम केले. अशा ‘हंग्री आणि फूलीश’ माणसाला माझी एक छोटीशी हेल्दी श्रद्धांजली.” असे म्हणत एक हिरवेगार सफरचंद त्यांनी स्टीव्हच्या फोटोसमोर ठेवले.
Sunday, September 25, 2011
एक ‘उनाड’ दिवस
रोज सकाळी आपण जागे झाल्यावर आपल्याला त्या दिवसाबद्दल, तो दिवस कसा जाणार आहे याबद्दल एक ‘फिलिंग’ येतं. म्हणजे काहीवेळा विशेष काही कारण नसतानाही खूप उत्साही, आनंदी वाटतं.. काहीवेळा समोर लख्ख सूर्यप्रकाशाने वातावरण उजळलेलं असतानाही कपाळावर आठ्यांची जळमटं साचतात.. तर कधी फारसं काहीही न जाणवता ‘मागच्या पानावरून पुढे सुरु’ असं म्हणत आपल्या उद्योगांना सुरुवात केली जाते.
अगदी नकळत येणाऱ्या अशा ‘फिलिंग’मुळे तो दिवस अनुभवण्याचा आपला एक ‘mind set’ तयार होतो... प्रत्येक दिवस कालच्यापेक्षा निराळा वाटतो (कदाचित त्यामुळेच रोज सगळं तसचं होऊनसुद्धा ‘रुटीन’ खूप जास्त कंटाळवाणे होत नाही आणि छोट्यामोठ्या सुट्यांची ‘लोडशेडिंग’ सोडली तर आयुष्यातली ३५-४० वर्ष नोकरीची ‘गिरणी’ अव्याहतपणे सुरु राहते.)
पण मागच्या गुरुवारी काहीतरी निराळंच झालं... सकाळी उठल्या-उठल्या त्या दिवसाबद्दल काहीतरी वेगळंच फिलिंग आलं... ते ‘विकेएंड’ ला येणाऱ्या फिलिंगसारखं नव्हतं किंवा झकास रजा टाकल्यावर त्या दिवशी सकाळी जसं वाटतं तसंही नव्हतं, काहीतरी वेगळंच वाटत होतं... कदाचित शाळेत असताना मे महिन्याच्या किंवा दिवाळीच्या सुटीच्या पहिल्या दिवशी जसं ‘सॉलिड हुंदडावसं’ वाटायचं वाटायचं, खूप काही करावसं वाटायचं तसं काहीतरी.
त्याचवेळी डोळ्यासमोर ऑफिस, रोजची धावाधाव, दिवसभरातल्या टीम मिटींग्ज, संध्याकाळचा कॉल हे अक्षरश: फेर धरून नाचत होते, पण आज ऑफिसला जावं असं चुकूनही वाटत नव्हतं. काय करावं? या संभ्रमात मी पडलो. ‘फार विचार करून निर्णय घेतला की तो हमखास चुकतो’ या माझ्या नेहमीच्या अनुभवाला स्मरून मी झटकन मॅनेजरला फोन करून ‘पर्सनल रिझन’चं रामबाण कारण देत ऑफिसचा विषय संपवला.. मोबाईल स्वीच ऑफ केला आणि ‘संध्याकाळपर्येंत येतो’ असं सांगून विचारल्या जाणाऱ्या सर्व प्रश्नांना फाट्यावर मारत मी घराबाहेर पळालो. कडक इस्त्रीचे फॉर्मल्स आणि चकचकीत बूट घालून ऑफिसच्या बसची वाट पाहत उभ्या असलेल्या ओळखीच्या कितीतरी जणांना, माझ्या हाफ पँटनी आणि फताडया स्लीपर्सनी जळवत मी गाडी ताणली.
तुफान भटकण्यासाठी आधी पोटाची टाकी फुल करणं गरजेचं होतं. पण ‘काय खावं?’ हा यक्ष प्रश्न होता. म्हणजे ‘पोटोबा’ तृप्त करण्यासाठी ‘श्री’ची मिसळ दाबावी... ‘स्वीट होम’ची इडली चेपावी... ‘वैशाली’मध्ये जाऊन चर चर चरावं की आज्ञाधारकपणे ‘अप्पाच्या खिचडीसाठी’ ओळीत उभं राहावं हे ठरवताना जरा गोंधळ होत होता. पण शेवटी ‘अप्पाला’ शरण जाऊन मी गप् ओळीत उभं राहिलो आणि ‘कशासाठी पोटासाठी’ म्हणत तुडुंब खिचडी हाणली.
पोट भरल्यावर डोक्यानी जरा विचार करायची तसदी घ्यायला सुरुवात केली आणि लक्षात आलं की कितीतरी दिवसांपासून काही पुस्तकं विकत घ्याची राहताहेत. आपसूक माझ्या गाडीने ‘अक्षरधारा’कडे मोर्चा वळवला. तिकडे जाताना हाफ पँट बदलून फूल पँटमध्ये जावं असा विचारही एकदा मनात आला. पण स्थळ-काळाचे कोणतेही बंध न बाळगता काहीही घालणाऱ्या मुलींच्या कपड्यांच्या तुलनेत माझी हाफ पँट अंगभर(??) असल्याने आणि त्याच्यात खिशात ‘क्रेडीट कार्ड’ नावाचे ‘ब्रह्मास्त्र’ असल्याने मला कोठेही बिनधास्त फिरता येईल असा ठाम विश्वास मला वाटत होता...अर्थात तो खराही ठरला.
‘अक्षरधारा’त वेळ कसा केला समजलच नाही. पु.लं, वं.पु, ग.दि.मा, शांता शेळके, भा.रा, भागवत ह्यांच्या मानदंड असलेल्या कलाकृतींच्या जोडीला प्रकाश आमटे, राजन खान, मधू लिमये, सुधा मूर्ती अशांसारख्या तगड्या लेखकांची उत्तमोतम पुस्तके तिथे होती. त्यामुळे ‘फास्टर फेणे’, ‘एक शून्य आणि मी’, ‘प्रकाशवाटा’, ‘भूलभुलैया’, ‘माणदेशी माणसं’, ‘लवासा’, ‘महाश्वेता’ अशी एकमेकांशी प्रचंड विरोधाभास असणारी पुस्तकं घेऊन मी बाहेर पडलो (या सगळ्यात एक चित्रकलेबद्दलचे पुस्तकही मी विकत घेतलं. ते घेताना हे आपण का? आणि कोणासाठी? घेतोय असा प्रश्न सतत पडत होता.. पण बहुतेक थोडी फार माझ्यासारखीच चित्रकलेची स्टाईल(????) असलेल्या कोणाला तरी ‘माणसासारखा माणूस’, ‘प्राण्यासारखा प्राणी’ काढायला जमला यानीच भरून येऊन मी ते घेतले असावे).
आता पुढे काय? असा प्रश्न पडायला आणि हनुमंताला करंगळीवर द्रोणागिरी उचलताना ‘ब्लॉक’ येईल.. इतका नाटकाचा सेट एका ‘अक्टीव्हा’वरून नेणारे काही ओळखीचे नाटकवाले कार्यकर्ते दिसायला एकच गाठ पडली. ‘पुरुषोत्तम’चे दिवस असल्याने वातावरण तापलेले होतेच. तालमी धडाक्यात सुरु होत्या.. त्यामुळे त्या वातावरणात दुपार मस्त गेली. इतर कॉलेजमध्ये काय सुरु आहे? कोणी कशी फिल्डिंग लावली आहे... कोणाची कोणती बक्षिसे नक्की आहेत.. कोण कोणाचा हिशोब चुकता करणार आहे?.. या वर्षी कोण तोडणार आहे? चोप्णार आहे? अशा बऱ्याच माहितीने ‘डेटाबेस’ अपडेट झाला... खरंतर ‘टवटवीत’ झाला.
संध्याकाळी टेकडीवर जायचा बेत आधीपासूनच नक्की होताच. त्या प्रमाणे टेकडी झाली... टेकडीवरून विस्तारलेलं शहर पाहताना ‘पूर्वीचं पुणं आता राहिलं नाही’ अशी कोणी विचारली नसतानाही प्रतिक्रिया देऊन झाली. रोज नेमाने टेकडीवर येणाऱ्यांना ‘उद्यापासून मी नक्की येणार’ असं भक्कम आश्वासन दिलं गेलं आणि त्यावर त्यांनीही ‘कळेलच’ असं अर्थपूर्ण हसूनही घेतलं. मग घरी येताना आज टेकडीवर गेल्यामुळे खूप कॅलरीज ‘बर्न’ झाल्यात असं सोयीस्कर वाटून सगळ्यांसाठीच ‘कल्याण भेळेचं’ पार्सल घेतलं. त्यामुळे माझी ऑफिसला मारलेली दांडी सत्कारणी लागल्याची पावती मला घरातल्या प्रत्येकानी दिली (उगाचच... कोणी मागितली होती?).
म्हणता म्हणता दिवस संपला. पण बागडण्याचा उत्साह किंचितही कमी झाला नव्हता त्यामुळे खूप दिवसांनी बिल्डींगमधल्या माझ्या एके काळच्या मित्रमंडळीना (त्यांची लग्न झाल्यापासून आमचा ‘काळ’ संपला) गच्चीत गोळा केलं. मंडळी बोलती झाली.. जुने विषय निघाले... जुन्या आठवणी निघाल्या... नेहमीच्या १-२ बकऱ्यांना भरपूर चिडवलं... संसारात पडल्यापासून ‘फॉर्मल’ झालेली ही मंडळी ‘इन फॉर्मल’ झाल्याचं पाहून खूप बरं वाटलं. शेवटी दर शनिवारी तरी गच्चीत भेटायचं नक्की(??) करून पांगापांग झाली... इतरांसारखाच मी पण अंथरुणात शिरलो आणि ‘उद्या ऑफिस’ या नुसत्या कल्पनेचीच भीती वाटून पांघरूण तोंडावरून ओढून घेतलं. पडल्या पडल्या मनात विचार आला की ‘आज आपण नेमकं काय केलं?’
आयुष्यभर चालणाऱ्या घर-ऑफिस-घर या आपल्या कंट्रोलच्या बाहेर गेलेल्या ‘रुटीन’मध्ये एखादा दिवस ‘उनाडपणे’ दांडी मारणं हे तसं अगदी शुल्लक. हे ‘रुटीन’ फाट्यावर मारून एक दिवस उनाडपणे भटकून तसं मी काही वेगळं, काही एक्स्ट्रॉ ऑर्डिनरी केलं नव्हतं... करणारही नव्हतो.
पण तरीही आजचा हा दिवस म्हणजे खट्याळपणे मुद्दामून ‘रुटीन’ची खोडी काढल्यासारखा ठरला. ‘रुटीन’ आपल्यासाठी असतं... ‘आपण’ रुटीनसाठी नसतो हे जाणवून देण्यासाठी पुरेसा. आपल्याला नेमका आनंद कशातून मिळतो ह्याची जाणीव करून देणारा आणि खरचं आपण आयुष्यभर हे असलं आपल्या कंट्रोलच्या बाहेरचं ‘रुटीन’ पाळून ‘बोअर’होणार आहोत का? हा विचार करण्यासाठी भाग पाडणारा...!!
Saturday, September 17, 2011
आपण ह्यांना पाहिलत का?
रविवार सकाळी अप्रतिम आळसावून स्वत:ला पांघरुणात गुडूप करून लोळण्यासारखं दुसरं सुख या जगात नाही. गेल्या रविवारी या स्वर्गीय सुखाचा उपभोग घेताना मी तल्लीन झालो असताना अचानक आमच्या मातोश्रीं प्रकटल्या आणि त्यांनी त्यांच्या आदेशाचं ब्रह्मास्त्र माझ्यावर सोडलं की ‘ आज खोली आवरून झाली नाही तर जेवायला मिळणार नाही’. गेले कित्येक रविवार मी ‘पुढच्या रविवारी खोली एकदम चकाचक करीन.. तू बघच’ असा आशीर्वाद देत आलो असल्याने यावेळी मला कोणतीच सवलत मिळायची काहीच शक्यता नव्हती.
‘नको देऊ जेवायला... मी बाहेरच जेवीन’ असा attitude दाखवला असता तर कानाखाली आवाज निघाला असता (मुलं मोठी झाल्यावर त्यांना घरातले बडवत नाहीत अशी जर कोणाची ‘गैर’समजूत असेल तर त्याला माझ्या घरी आग्रहाचे निमंत्रण आहे. इथे आपले सगळे गैरसमज दूर होतील. आजही माझे आईवडील स्वत:च्या आणि वेळ आल्यास दुसऱ्याच्या मुलांना बडवायचे calibre राखून आहेत... तेव्हा नक्की या)
थोडक्यात मी पुढच्या १५-२० मिनिटात खोली आवरण्यासाठी सज्ज झालो. तरी नेमकी सुरुवात कुठून करायची? आणि खोली आवरली आहे असा आईला किमान ‘फील’ येईल यासाठी नेमकं काय करायचं हे ठरवताना माझा काही वेळ गेला. त्यातल्या त्यात बरेचसे उगाचच गोळा केलेले कागद, ब्रोशर्स, पुस्तकं अशी रद्दी गोळा करून ती हातावेगळी केली की खोलीत बरीच जागा रिकामी होते, या आजपर्यंतच्या अनुभवला स्मरून मी रद्दीसाठी eligible गोष्टी शोधायला लागलो आणि शोधता शोधता काही कल्पना नसताना मला एकदम ‘खजिना’च मिळाला. प्री-प्रायमरी पासून ते कॉलेज संपेपर्यंतच्या वर्गाचे/ग्रुपचे फोटो असणारी फाईल मला अगदी अचानक सापडली.
आजपर्येन्तचे सर्व मित्र-मैत्रिणीं एकदम भेटावेत असं काहीतरी मला वाटलं. सोशल नेटवर्किंग साईटवर त्यातले काही लोक अधून मधून भेटायचे(?). पण त्यांचे वेगवेगळ्या वयातले फोटो मला का कोणास ठाऊक पण खूप जास्त जवळचे वाटले... ‘खरे वाटले’. सगळीच कोणत्या ना कोणत्या क्षेत्रातली गुणी माणसं. एकापेक्षा एक सरस... अव्वल... स्वत:च्या गुणांवर स्वत:ला हवं तसं जगता येण्याची क्षमता असलेली.
कोणाकडे चित्रकलेचा हात होता... कोणाचा गळा मैफल रंगवण्यासाठीच घडत होता... कोणाची माणसे जोडून ग्रुप लीड करण्याची हातोटी बेमिसाल होती... कोणाची बुद्धिबळातील आकलनशक्ती चकित करणारी होती. कोणाची खगोलशास्त्रातल्या कुतुहलापोटी न झेपणारी इंग्रजी पुस्तके वाचण्याची धडपड सुरु असायची... कोणी परत पायात धरून नृत्य करत समारंभ गाजवून जायचं... तर कोणाचं वक्तृत्व हमखास टाळ्या मिळवायचं. कोणाचं प्रगती पुस्तक complex देऊन जायचं तर काही जणींचं खेळाच्या मैदानावरील aggression धडकी भरवणायचं.
अशा असंख्य गुणवंत नक्षत्रांनी सजलेलं ते चित्ररुपी तारांगण पाहताना मनात पहिला प्रश्न आला की आज ही सगळी ‘भारी’ मंडळी आता कुठे आहेत?... माझ्या सोशल नेटवर्किंग साईटवरच्या प्रोफाइलमध्ये ही फक्त ‘नावापुरती’ आहेत. पण मी ज्यांच्याशी मैत्री केली होती.. ज्यामुळे करावीशी वाटली होती, तो मित्र, ती मैत्रीण कुठेतरी गायब झालीय.. त्यांची ती धमक झाकोळली गेलीय आणि म्हणूनच ते online भेटले तरी त्यांच्याशी connect होता येत नाहीये... आमच्यात संवादच होत नाहीये.
कारण मला संवाद त्या चित्रकाराशी त्याच्या नवीन चित्राशी करायचाय, गायिकेने शिकलेला नवीन राग- नवीन जागा ऐकून मंत्रमुग्ध व्हायचयं, एखाद्या जाडजूड खगोलशास्त्राच्या पुस्तकातली काही प्रकाशवर्षे दूर असणारी आकाशगंगा त्या हुशार मित्राकडून समजून घेऊन मला अवाक् व्हायचंय, badminton च्या कोर्टवर पुन्हा एकदा फाजील आत्मविश्वासाने मित्राला आव्हान देऊन मला हरायचय, बुद्धिबळाच्या डावात कात्रीत सापडल्यावर माझ्या मित्राला मला हसताना पहायचय.. १०० मी. पळताना माझ्या मैत्रिणीला माझ्यापेक्षा वेगात पळताना पाहून कावरंबावरं व्हायचय आणि चिडवून त्रास देणाऱ्यांना मला ‘बदकावून’ही काढायचंय.
पण ह्यातलं काही होत नाहीये कारण ही गुणी माणसं कुठेतरी हरवलीयत. जगाच्या रहाटगाडग्यात... करिअरच्या न संपणाऱ्या शर्यतीत... किंवा प्रोफेशनल लाईफ(?) मधल्या फसव्या ‘एटिकेट्स’मध्ये. म्हणून मला आज हे जुने फोटो माझ्या सर्व मित्र-मैत्रिणींना दाखवत ओरडून विचारायचय की ‘आपण ह्यांना पाहिलंयत का?’
माझी मैत्री या फोटोतल्या उत्साही, हरहुन्नरी आणि कशानी तरी ‘passionate’ असलेल्यांशी आहे. डीग्र्यांच्या कागदात स्वत:ला गुंडाळून एक तारखेला मिळणाऱ्या ‘पे चेक’कडे पाहत आपण खूप बुद्धिमान झालो आहोत असा टेंभा मिरवणाऱ्या कोणालाही मी ओळखत नाही आणि ओळखायची गरजही मला वाटत नाही.
मला ही सगळी हरवलेली मंडळी पुन्हा गोळा करायचीत.. म्हणूनच माझ्या शाळेतल्या फोटोकडे पाहत ‘आपण ह्यांना पाहिलंयत का?’ म्हणत मी आज माझ्यापासून सुरुवात केलीय. स्वत:ला शोधता शोधता मी बाकीच्यांना शोधायचा माझ्यापरीने निश्चित प्रयत्न करीन.. मग पुन्हा एकदा आम्हा ‘अवली’ मुलांचा वर्ग भरेल... धांगडधिंगा होईल... वातावरण दणाणून जाईल. तेव्हा कदाचित कोणीतरी मोठं(???) येऊन आमच्यावर वसावसा ओरडेल आणि त्यावेळी सगळ्यांच्या वतीने मी मोठ्या आनंदाने वर्गाबाहेर अंगठे धरून शांतपणे उभा राहीन...!!
Friday, September 16, 2011
हो.. चुकलो!
परवा संध्याकाळी एका डॉक्यूमेंटमधल्या काही चूका पाहिल्यावर त्या चूका ‘कशामुळे?’ (कुणामुळे नाही) झाल्या हे विचारणारा एक इ-मेल मी माझ्या टीमला पाठवला. त्याच्या उत्तरादाखल मला काल दुपारपर्यंत साधारण २५-३० मेल्स आले. गमतीची गोष्ट अशी की यातल्या एकाही मेलमध्ये नेमकी चूक कशामुळे झाली ह्याचा साधा उल्लेखही नव्हता. उलट प्रत्येकजण आपण आपले काम कसे नीट केले आहे हे समजावून सांगण्याचा आटापिटा करत होता.
खरतर प्रत्येकानी ते डॉक्यूमेंट तयार करताना कुठे ना कुठे माती खाल्ली होती पण आता ते कबूल करायची कोणाचीही तयारी नव्हती. त्याउलट त्या चूका एकमेकांवर ढकलण्यात त्यांची स्पर्धा सुरु झाली होती. मग दोन-तीन लोक उगाचच एखाद्याच्या डेस्कवर ‘असेच’ जमत होते. काहीजण/जणी अचानक(?) कॉफी मशीनपाशी भेटत होत्या. उगाचच लोकांना भरदुपारी जरा पाय मोकळे करायचे डोहाळे लागत होते.
शेवटी त्या केविलवाण्या धडपडीचा मला वैताग आला आणि मग मीच एक मेल लिहून तो विषय संपवला (त्या मेलमध्येही चुका ‘कुणामुळे’ झाल्या ह्याचा जाहीर उल्लेख मी कटाक्षाने टाळला.. मात्र ‘कोण कुठे चुकले आहे’ हे मला समजलेले आहे हे तो मेल वाचणाऱ्याला जाणवेल ह्याची काळजी मात्र घेतली).
असे किस्से घडले.. की कायम मला प्रश्न पडतो की जिथे ‘हो..चुकलो’ किंवा ‘हो.. चुकले’ असे म्हणत ती चूक नेमकी कशामुळे झाली? हे सांगून प्रश्न मिटू शकतो तिथे लोक ती चूक झाकण्यासाठी आपली पूर्ण शक्ती, बुद्धी का खर्च करतात? एखादी चांगली गोष्ट केल्यावर जसं आपण हक्काने त्याचे श्रेय घेतो, तसचं एखादी गोष्ट आपल्या हातून चुकल्यावर आपण त्याची जबाबदारी का घेत नाही? शंभरातल्या नव्व्याण्णव प्रसंगात पहिल्या फटक्यात चूक कबूल केली तर विषय तिथेच संपतो. पण आपण असे करत नाही. (मीसुद्धा ह्याला अपवाद नाही)
‘मनुष्य म्हणल्यावर तो चुकणार’ हे जगमान्य असतानाही आपण इतके का घाबरतो? हातून चूक होणं हे काही पाप नाही... दरवेळी तीच चूक होत असेल तर ती होऊ नये यासाठी विशेष मेहनतीची गरज असते आणि दरवेळी नवीन चूक होत असेल तर आपण काहीतरी प्रयत्नपूर्वक करतोय ह्याचेच ते द्योतक असते. पण दरवेळी हातून चूक झाली की ती चूक नेमकी कशामुळे झाली ह्याचा विचार करण्यापेक्षा त्याचा परिणाम आता आपल्या appraisal वर होणार या भीतीने पळवाट शोधायला सुरुवात केली जाते आणि ओढूनताणून दुसरा चुकीचा आहे हे दाखण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जातो.
मला प्रामाणिकपणे वाटतं की या पराभूत मनोवृत्तीचं मूळ आपल्या शिक्षणपद्धतीत दडलेलं आहे. जिथे आपली गुणवत्ता केवळ ‘किती चूक’ आणि ‘किती बरोबर’ ह्याची तागडी लावून मोजली जाते आणि जिथे ‘शिक्षण हे उत्तम नोकरी मिळवण्याचे माध्यम आहे’ ह्याचं बाळकडू नाक दाबून पाजलं जातं. दुर्दैवाने आपल्याला एकही शिक्षक असा भेटत नाही जो चुकल्यावर आपल्या पाठीवर प्रेमाने हात ठेऊन नेमकी कोठे गल्लत झाली ते सांगेल.. एखादा विद्यार्थी out of the box विचार करत असेल तर त्याला प्रोत्साहन देईल. आपल्याला प्रत्येक चुकीचा दणदणीत रट्टा बसतो आणि घरी आल्यावर अकलेचा उद्धार होतो. स्वाभाविकपणे आपण ‘चुका’ करायला घाबरला लागतो.. मात्र ही भीती आयुष्याचे संदर्भच बदलते.
कारण याच भीतीमुळे कमीतकमी ‘चूका’ होतील असे मार्ग.. अशा जागा आपण अगदी नकळतपणे शोधायला लागतो. त्यामुळे शिकतानाही ‘सायन्स’ स्ट्रीमला प्राधान्य दिलं जातं. बिझीनेस करणं out of question ठरवलं जातं. नोकरी शोधताना - ‘रिसर्च अन्ड डेवलपमेंट’ मध्ये स्वत:ला झोकून देऊन पुष्कळ चूका करत ‘नेमकं बरोबर काय आहे?’ हे शोधणं कटकटीचं वाटायला लागतं. त्यापेक्षा एखाद्या नामांकित आ.टी. कंपनीतला ग्रोथपाथ(???) आकर्षक वाटायला लागतो. आपले छंद हे फक्त सि.व्ही.वरची रिकामी जागा भरण्यापूरते उरतात. खेळावर एक्स्ट्रा करीक्यूलर म्हणून फुली मारली जाते (असं बरच काही जे आपल्या प्रत्येकाला आता जाणवलेलं आहे)
आज या विषयावर लिहिण्याचं कारण हेच की, चुकांना घाबरून पळण्याच्या स्वभावाचा आणि कायम दुसराच चूक आहे हे दाखवण्याच्या पोकळ धडपडीचा आपल्या शैक्षणिक आणि प्रोफेशनल दोन्ही करिअर बरोबरच personal life वर पण परिणाम होतोय... माझ्या तरी नक्कीच होतोय.
मैत्रीत, नात्यात, कुटुंबात समरस होऊन जगताना माझ्या हातून एखादी चूक नकळतपणे झाली आणि ती माझ्या लक्षात आली (किंवा आणून दिली) तरी ती मान्य करताना माझी जीभ अडखळतेय. मी त्या क्षणी चूक मान्य केल्यास समोरच दुखावलेली व्यक्ती झालेली गोष्ट विसरेल हे मला कळतय पण वळत नाहीये. उलट ती चूक झाकण्यासाठी मी माझा ‘इगो’ मध्ये आणतोय (इतक्या सहजतेने तो मध्ये येतोय की त्याला मला थांबवताच येत नाहीये) आणि गुंता वाढतोय.
वर्षानुवर्षाची मैत्री झटक्यात तुटतेय
कितीतरी अर्धवट उमललेली नाती या गुंत्यात अडकून कायमची कोमेजताहेत
एकत्र कुटुंब नव्या सुना – नवे जावई आल्यावर पत्त्याच्या बंगल्यासारखी मोडून पडताहेत.

