Friday, September 16, 2011

हो.. चुकलो!

परवा संध्याकाळी एका डॉक्यूमेंटमधल्या काही चूका पाहिल्यावर त्या चूका ‘कशामुळे?’ (कुणामुळे नाही) झाल्या हे विचारणारा एक इ-मेल मी माझ्या टीमला पाठवला. त्याच्या उत्तरादाखल मला काल दुपारपर्यंत साधारण २५-३० मेल्स आले. गमतीची गोष्ट अशी की यातल्या एकाही मेलमध्ये नेमकी चूक कशामुळे झाली ह्याचा साधा उल्लेखही नव्हता. उलट प्रत्येकजण आपण आपले काम कसे नीट केले आहे हे समजावून सांगण्याचा आटापिटा करत होता.

खरतर प्रत्येकानी ते डॉक्यूमेंट तयार करताना कुठे ना कुठे माती खाल्ली होती पण आता ते कबूल करायची कोणाचीही तयारी नव्हती. त्याउलट त्या चूका एकमेकांवर ढकलण्यात त्यांची स्पर्धा सुरु झाली होती. मग दोन-तीन लोक उगाचच एखाद्याच्या डेस्कवर ‘असेच’ जमत होते. काहीजण/जणी अचानक(?) कॉफी मशीनपाशी भेटत होत्या. उगाचच लोकांना भरदुपारी जरा पाय मोकळे करायचे डोहाळे लागत होते.

शेवटी त्या केविलवाण्या धडपडीचा मला वैताग आला आणि मग मीच एक मेल लिहून तो विषय संपवला (त्या मेलमध्येही चुका ‘कुणामुळे’ झाल्या ह्याचा जाहीर उल्लेख मी कटाक्षाने टाळला.. मात्र ‘कोण कुठे चुकले आहे’ हे मला समजलेले आहे हे तो मेल वाचणाऱ्याला जाणवेल ह्याची काळजी मात्र घेतली).

असे किस्से घडले.. की कायम मला प्रश्न पडतो की जिथे ‘हो..चुकलो’ किंवा ‘हो.. चुकले’ असे म्हणत ती चूक नेमकी कशामुळे झाली? हे सांगून प्रश्न मिटू शकतो तिथे लोक ती चूक झाकण्यासाठी आपली पूर्ण शक्ती, बुद्धी का खर्च करतात? एखादी चांगली गोष्ट केल्यावर जसं आपण हक्काने त्याचे श्रेय घेतो, तसचं एखादी गोष्ट आपल्या हातून चुकल्यावर आपण त्याची जबाबदारी का घेत नाही? शंभरातल्या नव्व्याण्णव प्रसंगात पहिल्या फटक्यात चूक कबूल केली तर विषय तिथेच संपतो. पण आपण असे करत नाही. (मीसुद्धा ह्याला अपवाद नाही)

‘मनुष्य म्हणल्यावर तो चुकणार’ हे जगमान्य असतानाही आपण इतके का घाबरतो? हातून चूक होणं हे काही पाप नाही... दरवेळी तीच चूक होत असेल तर ती होऊ नये यासाठी विशेष मेहनतीची गरज असते आणि दरवेळी नवीन चूक होत असेल तर आपण काहीतरी प्रयत्नपूर्वक करतोय ह्याचेच ते द्योतक असते. पण दरवेळी हातून चूक झाली की ती चूक नेमकी कशामुळे झाली ह्याचा विचार करण्यापेक्षा त्याचा परिणाम आता आपल्या appraisal वर होणार या भीतीने पळवाट शोधायला सुरुवात केली जाते आणि ओढूनताणून दुसरा चुकीचा आहे हे दाखण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जातो.

मला प्रामाणिकपणे वाटतं की या पराभूत मनोवृत्तीचं मूळ आपल्या शिक्षणपद्धतीत दडलेलं आहे. जिथे आपली गुणवत्ता केवळ ‘किती चूक’ आणि ‘किती बरोबर’ ह्याची तागडी लावून मोजली जाते आणि जिथे ‘शिक्षण हे उत्तम नोकरी मिळवण्याचे माध्यम आहे’ ह्याचं बाळकडू नाक दाबून पाजलं जातं. दुर्दैवाने आपल्याला एकही शिक्षक असा भेटत नाही जो चुकल्यावर आपल्या पाठीवर प्रेमाने हात ठेऊन नेमकी कोठे गल्लत झाली ते सांगेल.. एखादा विद्यार्थी out of the box विचार करत असेल तर त्याला प्रोत्साहन देईल. आपल्याला प्रत्येक चुकीचा दणदणीत रट्टा बसतो आणि घरी आल्यावर अकलेचा उद्धार होतो. स्वाभाविकपणे आपण ‘चुका’ करायला घाबरला लागतो.. मात्र ही भीती आयुष्याचे संदर्भच बदलते.

कारण याच भीतीमुळे कमीतकमी ‘चूका’ होतील असे मार्ग.. अशा जागा आपण अगदी नकळतपणे शोधायला लागतो. त्यामुळे शिकतानाही ‘सायन्स’ स्ट्रीमला प्राधान्य दिलं जातं. बिझीनेस करणं out of question ठरवलं जातं. नोकरी शोधताना - ‘रिसर्च अन्ड डेवलपमेंट’ मध्ये स्वत:ला झोकून देऊन पुष्कळ चूका करत ‘नेमकं बरोबर काय आहे?’ हे शोधणं कटकटीचं वाटायला लागतं. त्यापेक्षा एखाद्या नामांकित आ.टी. कंपनीतला ग्रोथपाथ(???) आकर्षक वाटायला लागतो. आपले छंद हे फक्त सि.व्ही.वरची रिकामी जागा भरण्यापूरते उरतात. खेळावर एक्स्ट्रा करीक्यूलर म्हणून फुली मारली जाते (असं बरच काही जे आपल्या प्रत्येकाला आता जाणवलेलं आहे)

आज या विषयावर लिहिण्याचं कारण हेच की, चुकांना घाबरून पळण्याच्या स्वभावाचा आणि कायम दुसराच चूक आहे हे दाखवण्याच्या पोकळ धडपडीचा आपल्या शैक्षणिक आणि प्रोफेशनल दोन्ही करिअर बरोबरच personal life वर पण परिणाम होतोय... माझ्या तरी नक्कीच होतोय.

मैत्रीत, नात्यात, कुटुंबात समरस होऊन जगताना माझ्या हातून एखादी चूक नकळतपणे झाली आणि ती माझ्या लक्षात आली (किंवा आणून दिली) तरी ती मान्य करताना माझी जीभ अडखळतेय. मी त्या क्षणी चूक मान्य केल्यास समोरच दुखावलेली व्यक्ती झालेली गोष्ट विसरेल हे मला कळतय पण वळत नाहीये. उलट ती चूक झाकण्यासाठी मी माझा ‘इगो’ मध्ये आणतोय (इतक्या सहजतेने तो मध्ये येतोय की त्याला मला थांबवताच येत नाहीये) आणि गुंता वाढतोय.

माझ्याच वयाच्या बरयाच लोकांच्या बाबतीत हे असंच होतय. त्यामुळे...

वर्षानुवर्षाची मैत्री झटक्यात तुटतेय

कितीतरी अर्धवट उमललेली नाती या गुंत्यात अडकून कायमची कोमेजताहेत

एकत्र कुटुंब नव्या सुना – नवे जावई आल्यावर पत्त्याच्या बंगल्यासारखी मोडून पडताहेत.

त्यामुळे मला आत्मविश्वासानी ‘हो.. चुकलो’ म्हणायला शिकायचय. ‘Rat Race मध्ये धावताना ‘चूक काय?’ आणि ‘बरोबर काय?’ ह्याच्या व्याख्या धुसर होण्याआधी.... लवकरात लवकर... समोरचा समजून घेणारा असला तरीही आणि नसला तरीही. कारण माझ्या चुका या माझ्याच आहेत आणि त्या आज मी मोकळेपणाने मान्य केल्या तरच उद्या काहीतरी हातून ‘बरोबर’ होण्याची आशा आहे... स्वत:पासून पळून जाऊन काहीच साध्य होणार नाहीये!

7 comments:

  1. छान लिहिलं आहेस! शेवटचं मला खूप पटलं......"माझ्याच वयाच्या बरयाच लोकांच्या बाबतीत हे असंच होतय."...एकदम बरोबर.....पूर्वी अगदी गळ्यात गळे घालून फिरणारे मित्र-मैत्रिणी हल्ली फोन केला तरीही जुजबी नेहेमीचं बोलून फोन ठेवून द्यायला लागले आहेत....अगदी दहा वर्षांपूर्वी अशक्य वाटणारा awkward silence आता अगदी भावांशी / बहिणींशी बोलतानाही जाणवतो आहे.

    ReplyDelete
  2. कुठलाहि मुद्धा मांडण्यात तुझ्हा हाथ कुणी धरू शकत नाही. हो चुकलो ची संकल्पना खूप चं मस्त मांडली आहेस. चुका point out करणे आणि ती दुसर्याला समजावून सांगणे हि पण एक कला आहे असे मला वाटते. कदाचित सांगण्याची पद्धत हि बर्याच वेळा matter करते . मला असे वाटते चुका का होतात या मध्ये गुरफटून जाण्या पेक्षा चुका न करता काम कसे करता येवू शकते याचा प्रताक्ष्य नमुना जर आपण स्वतः दाखवला तर आजू बाजूचे लोक सुधा ते बगून शिकू शकतील .

    अजूनही मी फोने कडे बगतो आणि मनात विचार येतात कि आज तर साहेबाना वेळ होईल फोने करायला ....पण....... ठरवले आहे न चुका कडत बसायचे नाही म्हणून .......

    लिखाण चालू ठेवावेस अशीच सदिच्या

    कळावे
    एक विसरून गेलेला मित्र
    निखील

    ReplyDelete
  3. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  4. "शंभरातल्या नव्व्याण्णव प्रसंगात पहिल्या फटक्यात चूक कबूल केली तर विषय तिथेच संपतो. पण आपण असे करत नाही." he agadi barobar lihila ahes. Pan ase kartana nehamich manasacha "EGO" madhe yeto. Aapan jar aapali chuk manya keli tar jagatlya baryacha goshti suralit hotil.
    It's nice and a realistic blog!!

    ReplyDelete
  5. always a fan of simplicity in ur writing and realistic approach :)) keep posting

    ReplyDelete
  6. छान लिहिले आहेस.
    'हो...चुकलो' असे बोलण्यासाठी लागणारे धाडस / मानसिकताच कमी आहे आपल्या सर्वानाकडे.
    अगदीच गरज पडली तर 'Sorry' हा १ शब्दच पुरतो आपल्याला....

    ReplyDelete