कितीतरी वेळा खूप काही बोलावसं वाटत असतानाही काही गोष्टी मनातच राहून जातात...
कोषातून बाहेर पडून उत्स्फूर्त दाद देण्याचा स्वभाव नसल्याने असेल... white collar असण्याच्या खोट्या ताठ्यात सजवलेल्या बुळेपणामुळे असेल... किंवा कदाचित स्वत:च्याच ego वर फुंकर घालण्यात धन्यता मानल्यामुळे असेल... पण या सगळ्यात वर्षानुवर्ष खूप गोष्टी व्यक्त करायच्या राहिल्या आहेत आणि राहत आहेत.
आता त्याचा त्रास व्हायला लागलाय... व्यक्त न झाल्याची बोच वाढायला लागलीय म्हणून आता 'Better late than never' म्हणत त्या 'अव्यक्त' गोष्टींशी बोलायचं ठरवलंय.
कारण कोणाला करकचून मिठी मारायची राहिलीय ... कोणाला तरी अजूनही कचकचीत शिवी घालायचीय.... कोणाला न मिळालेल्या प्रश्नांची उत्तरे 'मिळणार नाहीत' हे माहिती असतानाही पुन्हा विचारायची आहेत... कोणाला अगदी मनापासून sorry म्हणायचय... तर कोणाच्या तरी हातात हात घालून अर्ध्या चड्डीत तुफान बागडायचय.
त्यामुळेच हा प्रवास मजेदार असणार आहे... वळणावळणावर नवीन पात्र भेटतील... अस्पष्ट संदर्भांच्या वेटिंग रूममध्ये स्थळ-काळाच्या नियमांना बाजूला ठेवून नात्यांच्या, मैत्रीच्या रेशीमगाठी अलगद उलगडतील... ' all is well ' वाटत असताना अचानक जाणवलेला 'गुंता' प्रवासावरच प्रश्नचिन्ह उभे करून जाईल... त्याचवेळी हमाली करणाऱ्या एखाद्या चुरगळलेल्या, मळलेल्या हातातली रग आधार देऊन जाईल.
तुम्हाला पण हे खूप जवळचं वाटेल... उगाचच जपून ठेवावं असं वाटायला लावणाऱ्या चमचमणाऱ्या chocolate च्या चांदीसारखा आकर्षक.... हरवलेलं 'ठकठक', 'चंपक', 'चाचा चौधरी' सापडल्यावर होणाऱ्या 'अदभूत' आनंदासारखं... किंवा आपलंच प्रतिबिंब पाहिल्यावर क्षणभरासाठी अंतर्मुख झाल्यासारखं... काहीतरी!!
मस्त रे!! अजून खूप छान छान लिहिण्यासाठी शुभेच्छा!
ReplyDeleteधन्यवाद मित्रा :)!
ReplyDeleteGood luck for your new blog!
ReplyDelete